एसबीसी विणकर समाजासाठी लवकरच स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार – एकनाथ शिंदे मुख्यमंत्री

एसबीसी विणकर समाजासाठी लवकरच स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार – एकनाथ शिंदे मुख्यमंत्री

मुंबई : राज्यातील विशेष मागास प्रवर्गाच्या प्रश्नांबाबत दि. 26/06/2023 रोजी मा.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विशेष मागास प्रवर्गातील विणकर समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी करण्यात आली होती. यावेळी झालेल्या चर्चेत राज्यातील विणकर समाजातील काही जाती विशेष मागास प्रवर्गात आहेत, तर काही जाती इतर मागास वर्गात आहेत. अशी माहिती पुढे आली होती. या बाबत तपशीलवार माहिती सादर करण्याच्या सूचना शिष्टमंडळास देण्यात आले होते.

त्यास अनुसरुन राज्यातील सर्व विणकर जाती संबंधीची तपशीलवार माहिती विणकर समाजाचे नेते व जालन्याचे आमदार कैलास गोरंटयाल यांनी विशेष मागास प्रवर्गातील विणकर बांधवांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करुन भरघोस निधीची तरतूद करावी याबाबतचा सविस्तर प्रस्ताव मा. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री यांचेकडे सादर केला आहे. त्यात त्यांनी नमूद केले आहे की,

“ राज्यातील सर्व विणकर जाती या पूर्वी इतर मागास वर्गात होते. सन 1994 साली शासनाने एसबीसी प्रवर्गाची निर्मिती करुन गोवारी सह पद्मशाली, कोष्टी, स्वकुळ साळी, कोळी व अन्य काही मागास जातींचा एसबीसी मध्ये समावेश केला आहे. सन 1994 पूर्वी पद्मशाली, स्वकुळ साळी, कोष्टी हे समाज इतर मागास वर्गात होते. तसेच केंद्राच्या इतर मागास वर्गाच्या यादीत समाविष्ट आहेत. राज्यातील विशेष माागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गात असलेल्या विणकर जातींचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

विशेष मागास प्रवर्गातील विणकर जाती : पद्मशाली, चन्नेवार,चेन्नेवार सालेवार,साळी,कोष्टी, स्वकुळ साळी, लाडकोष्टी, गढेवाल कोष्टी,देशकर,देवांग,सटसाले,जैन कोष्टी,

इतर मागास वर्गाातील विणकर जाती : रंगारी,भावसार,कुरुहिनशेट्टी, निलगार, निळी, निळकंठ, निराळी, देवांग कोसकंटी, मद्विरशैव कुरुहिनशेट्टी, विणकर, चेनवु, चेनुवार, दासर, जुलाहा,अन्सारी

पद्मशाली, कोष्टी, स्वकुळ साळी समाज हा मूळचा विणकर आहे. हा समाज तेलंगणा कर्नाटक प्रांतातून सुमारे 150 वर्षापूर्वी स्थलांतर झाला असून राज्यात सोलापूर, पुणे, मुंबई, भिवंडी, अहमदनगर, संगमनेर, नांदेड, जालना, हिंगोली, परभणी, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, या शहरात मोठया संख्येने स्थिरावला आहे. महाराष्ट्रातातील वरील विणकर जातीत पद्मशाली बहुसंख्य आहेत. हा समाज आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक दृष्टया अत्यंत मागासलेला आहे. वंशपरांपरागत हातमागावर वस्त्र विणण्याची कला हस्तगत करत पद्मशाली समाजबांधव आपली गुजराण करत होते. परंतु यांत्रिकी करणाच्या ओघात हातमाग व्यवसाय अडचणीत आला. पर्यायाने उपजिविकेसाठी अन्य क्षेत्रात रोजगार शोधावा लागला. कुटुंबातील अनेक जण बिडी कामगार, यंत्रमाग कामगार, शिलाई कामगार सारख्या पर्यायी रोजगारात सामावली आहेत. आज अनेक युवक शिक्षण घेवून अन्य क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करु पाहात आहे. परंतु व्यवसायासाठी लागणारे भांडवल उभे करणे त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यांना आधार देण्यासाठी शासनाने वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळात कर्ज देण्याचे धोरण स्विकारले. परंतु या महामंडळात पूर्वीपासून ज्या जाती समाविष्ट आहेत. त्या समाजाच्या प्रतिनिधींचे महामंडळावर वर्चस्व आहे. परिणामी विशेष मागास प्रवर्गास कर्जाचा कोणताही लाभ होवू शकलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे विशेष मागास प्रवर्गाकडून स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची मागणी सातत्याने करण्यात येवू लागली.

इतर मागास वर्गात असलेल्या जातींसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्जे देण्यात येतात. यामध्ये इतर मागास वर्गातील वरील विणकर जाती देखील समाविष्ट आहेत. सबब एस बी सी साठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्यास त्याचा लाभ होवून विशेष मागास प्रवर्गातील विणकर बांधवाना न्याय मिळेल अशी आग्रहाची मागणी त्यांनी केली आहे.”

तसेच एसबीतील विणकर बांधवांच्या वतीने विशेष मागास प्रवर्गातील विणकर बांधवांना शैक्षणिक व स्वयंरोजगाराच्या सहायमुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी शासनास शिफारस करण्याची विनंती सह निमंत्रक तथा भाजपाचे नेते सुनील देसाई नाशिक मुंबई पद्मशाली प्रांत संघ ओबीसी एसबीसी विभाग चेअरमन राजू गाजेंगी यांनी नाशिकचे आमदार तथा मंत्री छगन भुजबळ, नाशिकचे आमदार सिमाताई हिरे, आमदार देवयानी फरांदे, भिवंडीचे आमदार महेश चौघुले, खासदार हेमंत गोडसे, आमदार सत्यजित तांबे यांना केली.

आपल्या मतदार संघातील विणकर बांधवांना स्वयंरोजगार व शिक्षणासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ किंवा उपकंपनी स्थापन करुन त्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करुन द्यावा. अशी आग्रहाची मागणी ओबीसींचे नेते मा.मंत्री छगन भुजबळ, आमदार देवयानी फरांदे, आमदार सिमाताई हिरे, महेश चौघुले, खासदार हेमंत गोडसे यांनी मा.मुख्यमंत्री महोदयांची समक्ष भेट घेवून विणकर बांधवांच्या समस्या मांडून विणकरांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळाची आग्रहाची मागणी लेखी निवेदनाव्दारे केली. यावेळी बोलतांना एसबीसी विणकर बांधवांसाठी लवकरच स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येईल असे आश्वासन मा.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी शिष्टमंडळास दिले.

याकामी विशेष मागास प्रवर्गाचे निमंत्रक अशोक इंदापुरे सोलापूर सह निमंत्रक सुनील देसाई नाशिक मुंबई पद्मशाली प्रांत संघ ओबीसी एसबीसी विभाग चेअरमन राजू गाजेंगी यांनी विशेष प्रयत्न केले.

Share this News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *