नाशिकरोड (प्रतिनिधी) नाशिक शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी पोलिस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नाशिक शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीचा बीमोड करायला सुरुवात केली असून शहरात कोंम्बींग ऑपरेशन राबवत टवाळखोर व माद्यपींना त्यांनी रडारवर घेऊन कारवाईला सुरुवात केली आहे.पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार नाशिकरोड पोलिसांनी आपल्या हद्दीत कोंम्बींग ऑपरेशन राबवत सुमारे 35 मद्यपींना पोलिसी खाक्या दाखवत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे .
पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी नाशिक शहर पोलिस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्या नंतर नाशकात दोन खुनाच्या घटना घडल्या. या घटना नेमक्या कश्या मुळे घडल्या याचा अभ्यास करुन आयुक्त कर्णिक यांनी शहरात काल संध्याकाळी सात ते अकरा वाजे दरम्यान कोंम्बींग ऑपरेशन राबवले आहे.
त्या अनुषंगाने नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके व त्यांच्या टीम ने नाशिकरोड परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करीत 35 मद्यापी टवाळखोर यांना लक्ष करीत पोलीस ठाण्यात आणले व प्राथमिक चौकशी करुन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत काही तासानंतर त्याना मुक्त केले. सोबतच पोलीसांची करडी नजर तुमच्यावर कायम राहणार असल्याने कायद्यात रहा असा सज्जड दम ही पोलिसांनी मद्यपींना भरला आहे. पोलीस आयुक्तांच्या सुचनेनुसार नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके हे देखील ताबडतोब ॲक्शन मोड आल्याचे चित्र निर्माण झाले असून नागरिकांनी या मोहिमेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.