वाढदिवशीच ॲक्शन मोड! मंत्री नरहरी झिरवाळांची नाशिक दूध बाजारात धडक तपासणी

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यभर भेसळीविरोधात सुरू केलेल्या धडक कारवाईमुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असतानाच आता अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ हे देखील ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून आले.

आपल्या वाढदिवशीच मंत्री झिरवाळ यांनी नाशिक शहरातील दूध बाजारात अचानक धडक देत दुधाच्या गुणवत्तेची तपासणी केली. पहाटेपासूनच सुरू झालेल्या या तपासणी मोहिमेमुळे दूध विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. बाजारात विक्रीसाठी आलेल्या दुधाचे नमुने तपासण्यात आले तसेच विक्रेत्यांच्या नोंदींचीही पाहणी करण्यात आली.

यावेळी मंत्री झिरवाळ यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यपद्धतीतून प्रेरणा घेत आपण वाढदिवशीही जनहिताचे काम करण्याचा निर्णय घेतला. “लोकांच्या आरोग्याशी संबंधित विषयांमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.

दूध बाजारातील दोन ते तीन ठिकाणी करण्यात आलेल्या प्राथमिक तपासणीत कोणतीही भेसळ किंवा गंभीर त्रुटी आढळून आली नसल्याचे झिरवाळ यांनी स्पष्ट केले. मात्र, राज्यभर अन्न व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळीविरोधातील मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भेसळविरोधी मोहिमेला आता मंत्रिस्तरावरूनही बळ मिळत असल्याने अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आगामी काळात अधिक कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Share this News