पारगाव : बेल्हे जेजुरी महामार्गावर आंबेगाव व शिरूर तालुक्याच्या हद्दीवर लाखणगाव(ता. आंबेगाव) व जांबूत(ता. शिरूर) या दोन गावांच्या दरम्यान आज सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पुर्ण वाढ झालेल्या नर बिबट्या ठार झाला आहे.
आंबेगाव तालुक्याचा पूर्व भाग व शिरूर तालुक्याचा पश्चिम भाग हा परिसर बिबट प्रवण क्षेत्र आहे या भागात बिबट्याचा रात्र असो कि दिवस नेहमी संचार असतो या परिसरातील नागरिकांना शेतात काम करताना अनेकदा बिबट्याचे दर्शन होते बिबट्याचे पाळीव जनावरांवर हल्ले तर नेहमीचेच आहे या भागात रात्रीच्या वेळी मोटारसायकलवरून जाणाऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याचे काही घटना घडल्या आहेत.
आज सायंकाळी लाखणगाव येथील न्यु. इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक प्राचार्य अनिल देसले शाळा सुटल्यानंतर आळेफाटा येथे जात असताना बेल्हे जेजुरी महामार्गावरील लाखणगाव – जांबुत दरम्यान पंचतळे परिसरात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अंदाजे पाच ते सहा वर्ष वयाचा नर बिबट्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचा दिसला काही नागरिक जमा झाले होते
बिबट्या ठार झाल्याची माहिती प्राचार्य देसले यांनी मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस व वनपाल सोनल भालेराव यांना मोबाईलवरून दिली या घटनेची माहिती मिळताच वनरक्षक साईमाला गित्ते, वनरक्षक पूजा पवार व रेस्क्यू सदस्य अशोक जाधव त्याचबरोबर शिरूर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले आहे.
यासंदर्भात शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले वनपाल गणेश पवार व वनरक्षक नारायण राठोड यांनी मृत बिबट्याला ताब्यात घेतले असून शिरूर येथील कार्यालयात घेऊन येणार आहे उद्या सकाळी बिबट्याचे शवविच्छेदन करून त्यावर वनविभागाच्या कार्यालयाच्या आवारात मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार करणार आहे.