श्रीकांत बेणी यांचा सह्याद्री भूषण पुरस्काराने गौरव
नाशिक दि. 28/07/2023
शतक महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या नाशिक वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांचा सह्याद्री भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
12 जुलै 1660 रोजी भर पावसात सिद्धी जौहरच्या पन्हाळ गडाच्या वेढ्यातून छत्रपती शिवाजी महाराज निसटून विशाळगडावर पोहोचले त्यावेळी झालेल्या पावनखिंडीतील रणसंग्रामात शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यासह अनेक मावळ्यांनी प्राणांची आहुती दिली. हिंदवी परिवाराच्या वतीने गेल्या पंधरा वर्षांपासून दरवर्षी पावनखिंडीत 52 किमी पायी जाऊन हिंदवी परिवाराचे सदस्य या ऐतिहासिक रणसंग्रामाचे स्मरण करतात. शिवव्याख्याते आणि हिंदवी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवरत्न शेटे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात प्रेरणादायी काम करणाऱ्या व्यक्तींचा सह्याद्री भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो.
गेली 32 वर्षे वसंत व्याख्यानमालेत काम करताना श्रीकांत बेणी यांनी सुमारे 10 हजार व्याख्यानांचे आयोजन आजवर केलेले आहे. शताब्दी वर्षात तर यंदा जगभरातील व्याख्यात्यांना आमंत्रीत करून व्याख्यानामालेला लोकल ते ग्लोबल असे वैभवशाली स्वरूप प्राप्त करून देण्यात आले आहे. या कामाबद्दल डॉ. शिवरत्न शेटे यांच्या हस्ते श्रीकांत बेणी यांना सह्याद्री भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराबद्दल बेणी यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.