बडी दर्गा परिसरास लागून असलेल्या डिंगरअळी चौकात बोरसे वाडा कोसळण्याची घटना घडली. रात्री घटना घडल्याने दुर्घटना टळली. यंदा पावसाळ्यातील वाडा कोसळण्याची ही पहिली घटना आहे.
पावसाळा सुरू होताच पंचवटी, जुने नाशिक भागात असलेले धोकादायक वाडे कोसळण्याच्या घटना घडत असतात.
गेल्या वर्षी सुमारे २० ते २५ वाडे कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. यंदा तसे प्रकार घडले नव्हते. शुक्रवारी (ता. २१) रात्री सुमारे अकराच्या सुमारास मात्र डिंगरअळी परिसरात बोरसे वाडा कोसळण्याची घटना घडली.
रात्रीची वेळ असल्याने सुदैवाने कुठलीही दुर्घटना घडली नाही. वाडा धोकादायक झाल्याने तो उतरवून नवीन बांधकाम करणे निमित्ताने दोन महिन्यापूर्वीच वाड्यातील कुटुंबीय अन्य ठिकाणी स्थलांतरित झाले होते.
शुक्रवारी अचानक वाडा कोसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दैनंदिन या ठिकाणी असलेल्या रस्त्यावर परिसरातील लहान मुले तरुण क्रिकेट खेळत असतात. वाडा कोसळला त्या वेळेस कुणीही त्या ठिकाणी नसल्याने अनर्थ टळला.
परिसरातील तरुणांनी कोसळलेल्या भागाच्या बाजूने बॅरिकेट्स उभे करून धोका टाळण्याचा प्रयत्न केला आहे.
बडी दर्गा परिसरातील मदरसामध्ये मोहरम निमित्ताने धार्मिक प्रवचनाचा कार्यक्रम सुरू होता. परिसरातील नागरिक, तरुण तसेच लहान मुले प्रवचनासाठी मदरसामध्ये बसले होते. त्याचवेळी अचानक वाड्याची भिंत रस्त्यावर कोसळली.
भिंत कोसळण्याचा आवाज झाल्याने तरुणांनी त्या दिशेने धाव घेतली. परिसरात असलेला पोलिस विभागाचा बॅरिकेट कोसळलेल्या भागाच्या बाजूने उभा केला. इतर भागात दोरी बांधून बॅरिकेटिंग केली. जेणेकरून कुणीही त्या ठिकाणी जाऊ नये.
इतर वेळेस घटना घडलेल्या रस्त्यावरच तरुण तसेच लहान मुले काही वेळ क्रिकेट खेळत असतात. काहीजण शतपावली करत असतात. त्या दिवशी धार्मिक प्रवचनामुळे सर्वजण मदरशांमध्ये असल्याने अनर्थ टळला.