मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते एशियन गेम्समध्ये कब्बडी खेळात सुवर्णपदक विजेता आकाश शिंदे याचा सत्कार
कब्बडीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे श्रेय आदरणीय शरद पवार साहेब व बुवा साळवी यांचं- मंत्री छगन भुजबळ
आकाश शिंदे तरुणाईसाठी आयकॉन बनलाय – मंत्री छगन भुजबळ
आकाशला राज्य सरकारकडून भरघोस मदत देणार – छगन भुजबळ
शिंदे तरुणाईसाठी आयकॉन बनला असुन त्याला राज्य शासनाच्या वतीने लवकरात लवकर भरघोस मदत मिळवून दिली जाईल असे आश्र्वासन देऊन देशात कब्बडी खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं श्रेय आदरणीय शरद पवार साहेब व बुवा साळवी यांच असल्याचं प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलं.
ब्रम्हा स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आज आडगाव येथे एशियन गेम्समध्ये कब्बडी खेळात सुवर्णपदक विजेता आकाश शिंदे याचा नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आकाश शिंदे याचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी आमदार राहुल ढिकले, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जयवंतराव जाधव, उद्योजक विलास शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगिर, माजी नगरसेवक उध्दव निमसे, शितल माळोदे,सुरेश खेताडे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षका शैलजा जैन, ॲड.नितीन माळोदे, शैलेश मुसळे,मोहन गायकवाड, शरद पाटील, वाल्मीक बागुल, प्रा.हेमंत पाटील, रणजित राऊत, सतीश सुर्यवंशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकला लाभलेली निसर्गसंपदा आणि आरोग्यदायी वातावरणामुळे खेळाडूंसाठी निर्माण झालेल्या पोषक वातावरणाचा नाशिकच्या खेळाडूंनी योग्य वापर करून घेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविला आहे.यामध्ये अर्जुन पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय खेळाडू कविता राऊत, विदित गुजराथी, दत्तू भोकनळ, अंजना ठमके यांसारख्या नामांकित खेळाडूंनी नाशिकचे नाव अटकेपार पोचवले. आता आकाश शिंदे यांच्या यशाने नुसत आडगाव नव्हे तर देशाचं नाव उज्ज्वल झालं आहे.
ते म्हणाले की, नाशिकच नाव ज्या खेळाडूंनी अधिक उज्ज्वल केलं आहे. त्या खेळाडूना शासकीय नोकरीत सामावून घेण्यासाठी आपले प्रयत्न आहे. लवकरच आकाश शिंदे यांनाही शासकीय नोकरीत सामावून घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. तसेच नाशिकच्या खेळाडूंना अधिक सुविधा मिळाव्यात यासाठी तालुका क्रीडा संकुल, जिल्हा क्रीडा संकुल, विभागीय क्रीडा संकुलाच्या विकासासाठी भरघोस निधी मंजूर करण्यात येत आहे. तसेच इतरही आवश्यक निधी मंजूर करण्यासाठी आपले प्रयत्न असतील असे त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले की, नाशिकची जनता, सामाजिक संस्था, राजकीय पदाधिकारी यांनी नाशिकमधून विविध खेळात पुढे येत आहे. त्यांना आवश्यक ती मदत करण्यात यावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आकाश शिंदे व कुस्तीगिर हर्षवर्धन सदगिर यांना मंत्री छगन भुजबळ यांनी वैयक्तिकरित्या प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत घोषित केली.