
शहरात पर्यावरण संवर्धनाची दिशा देणाऱ्या एका अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आकाशवाणी टॉवरजवळील भाजी बाजार येथे करण्यात आला. नाशिक महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ गोदावरी यांच्या संयुक्त विद्यमाने कापडी पिशवीच्या वेंडिंग मशीनचे उद्घाटन महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मा. मनीषा खत्री यांच्या हस्ते संपन्न झाले.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात प्लास्टिकमुक्त वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, भाजी बाजार व विविध बाजारपेठांमध्ये पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचा वापर वाढविण्यावर भर दिला जात आहे.
या प्रसंगी बोलताना आयुक्त मनीषा खत्री यांनी, “प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर ही काळाची गरज आहे. प्रत्येक नाशिककराने पर्यावरण पूरक पर्याय स्वीकारल्यास गोदावरी नदीचे व शहराचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल,” असे आवाहन केले.
रोटरी क्लब ऑफ गोदावरीच्या अध्यक्षा डॉ. मीनल पलोड यांनी या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, “या वेंडिंग मशीनद्वारे नागरिक सहजरीत्या कापडी पिशव्या कमी पैशात विकत घेऊ शकतात. लवकरच नाशिकमधील इतर भागांमध्येही हा उपक्रम राबविला जाणार आहे.”
या प्रसंगी क्लबचे प्रकल्प समन्वयक बसवराज अंगाडी, सचिव डॉ. मेघा नाठे, डॉ. प्रणिता गुजराती, इंजिनिअर महेश बागुल, सोनाली नेरकर,भूषण पाटकर, ओंकार महाले, मधुकर फटांगरे तसेच रोटरी क्लब गोदावरीचे सदस्य व नाशिक महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता सचिन जाधव, संदेश शिंदे, प्रशांत बोरसे, पालवे व जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हा उपक्रम शाश्वत पर्यावरण रक्षणासाठी एक सकारात्मक पाऊल असून, यामुळे नाशिक शहराच्या स्वच्छता व प्लास्टिकमुक्ततेच्या उद्दिष्टांना निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
