प्रति,
वंदनीय गणपती बाप्पा
सप्रेम नमस्कार,
तू दहा दिवस आला काय अन लगेचच गेला काय… काय, कसं काही कळलच नाही. तू येणार अशी चाहूल लागली तेव्हापासूनच सर्वांमध्ये उत्साह संचारला होता. तुझा गृहप्रवेश झाला आणि घंटी टाळ मृदुंगाच्या नादात सर्व बेभान होऊन बेधुंद तुझ्या भक्तीत रमले. प्रसाद खाण्यासाठी विविध स्पर्धात भाग घेण्यासाठी चिमुकले गर्दी करू लागले. चौकाचौकात लाईट, मंडप, सजावट, डेकोरेशन दिसू लागली. तुझ्या येण्याने निसर्गालादेखील आनंद झाला रोज तो हजेरी लावून गेला आणि माझा शेतकरी राजा सुखावला. साऱ्या भक्तांची पाण्याची समस्या पुढील वर्षभर मिटवली देवा. तू चिंतामुक्त केले अनेक आजारांना तू अटकाव केला. पाऊस धो धो बरसला आणि सारं काही न्हाऊन निघालं. प्रत्येकाचं मन स्वच्छ करून तुझ्या उत्सवात भक्तीत दहा दिवस सर्व तल्लीन झाले. या दहा दिवसात अनेक हातांना रोजगार मिळाले. मूर्ती विकणारे फुल-फळं विकणारे, हार विकणारे, मंडप बांधणारे यांना रोजगार मिळाला. तू आला तेव्हा थोडी मिठाई कडवटच होती कारण भेसळयुक्तची भीती होती पण असो घरचा मोदक खाण्यात जो आनंद होता तो काही औरच होता हे यामुळे अनेकांना समजलं,आणि त्यात सत्यनारायणाचा सव्वा किलोचा प्रसाद साजूक तुपातला तो शेवटी शेवटी खाताना तर खूपच जिभेला तृप्त करून गेलं. बाप्पा आता तुझा निरोप घेतलाय आम्ही,पण निरोप घेता घेता प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आलेत बाप्पा. का तू एवढं प्रेम दिलंस, का तू एवढा उत्साह प्रत्येकात संचारला? का तू घराघरात मोरयाचा गजर केला? तरी या दहा दिवसात किती प्रेम देऊन गेला? किती आपुलकी निर्माण करून गेला? धकाधकीच्या जीवनात छोट्या छोट्या स्पर्धामुळे या युगात कोणी जिंकला तर कोणी हरलं पण तू सगळ्यांचेच मन जिंकले रे बाप्पा…
आणि हो बाप्पा यावर्षी सर्वांनीच तुला पुढच्या वर्षी घेऊन यायचा एक नवा संकल्प केला.. पर्यावरण पूरकच गणराज घेऊन यायचे असा निश्चय केला आम्ही, तुला मूर्तीदानाच्या रूपात दान देखील केल. या पुढे माझ्या गोदामाईला पर्यावरण पूरक ठेवण्याची सर्वांनी तुला निरोप देतांना शपथ घेतली. रात्री उशिरा तुला निरोप देताना अगदी भरून आलं होत. पण हा संसाराचा नियमच आहे. ज्याला यायचंय त्याला एक दिवस जायचंय, हे तू आम्हाला शिकवून गेला. तुझ्याकडे एकच मागणे तू असाच येत जा, सर्वांना आनंदी करत जा, आणि तुझा उत्सव ज्या उद्देशाने सुरू झाला आहे तो उद्देश सगळ्यांना तू आठवण करून देत जा. सर्वांनी एकत्र येऊन गुण्यागोविंदाने आपल्या विचारांची, संस्कृतीची, देवाणघेवाण केली पाहिजे. हे तू प्रत्येकाच्या कानात महिन्यातून एकदा येऊन संकष्टी चतुर्थीला सांगत जा. एवढेच माझं मागणं बस बाप्पा तुला किती त्रास द्यायचा.पत्र पुरे करतो, पुन्हा भेटेल मी येत्या गणेश चतुर्थीला, तू येतोय ना मी येईल लवकरच नवश्या, ढोल्या, सिद्धिविनायक,
मोदकेश्वर, साक्षी, पाषानेश्वर, इच्छामणी गणपती मंदिरात
पुरे करतो. रोजचं रुटीन सुरू करावं लागेल तीच धावपळ तेच काम
येतो बाप्पा लवकरच….
गणपती बाप्पा मोरया
तुझा भक्त….
जोश योगेश कमोद